Wednesday 21 December 2016

सोलकढी

साहित्य:
७ ते ८ आमसुलं
१ कप नारळाचे दूध
१ ते २ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
२ लसूण पाकळ्या
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१/२ टिस्पून जिरेपूड
चवीपुरते मिठ
१/२ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे

कृती:

१) आमसुलं १/२ कप गरम पाण्यात भिजत टाकावीत. अर्ध्या-पाऊण तासाने त्याच पाण्यात आमसुलं कुस्करून घ्यावीत आणि पाणी गाळून घ्यावे.
२) कोथिंबीर आणि मिरची एका वाडग्यात घ्यावे. त्यात किंचीत मिठ घालून हाताने किंवा चमच्याने कुस्करावे.
३) लसूण बारीक चिरून घ्यावी.
४) जिरे किंचीत कुटून घ्यावे.
फोडणी न करता सोलकढी ::::
नारळाच्या दुधात आमसुलाचे पाणी, कुस्करलेली कोथिंबीर मिरची, चिरलेली लसूण आणि कुटलेले जिरे मिक्स करावे. चवीपुरते मिठ घालावे.
फोडणी केलेली सोलकढी::::
नारळाच्या दुधात आमसुलाचे पाणी, कुस्करलेली कोथिंबीर मिरची आणि चिरलेली लसूण घालून मिक्स करावे. चवीपुरते मिठ घालावे. कढल्यात तूप गरम करून त्यात कुटलेले जिरे घालून हि फोडणी नारळ दुधाच्या मिश्रणात घालावी आणि निट मिक्स करावे.
थंडच सर्व्ह करावे किंवा अगदी मंद आचेवर कोमटसर करावे जास्त गरम करू नये. सर्व्ह करताना वरून जिरेपूड भुरभूरावी. जिरेपूड आधीच मिक्स करू नये नाहीतर सोलकढीचा रंग बदलतो.
सोलकढी नुसतीच किंवा भाताबरोबर खायलाही छान लागते.

टीप:
१) १/४ कप घट्टसर आंबट ताक घातले तर खुप छान चव येते.
२) कोकमाचे आगळ म्हणजेच साखरविरहित कोकमाचा घट्ट कोळ (Kokum Concentrate) बाजारात विकत मिळतो. ते वापरूनही सोलकढी बनवता येते.




No comments:

Post a Comment