Wednesday 21 December 2016

कोल्हापूरी मिसळ


साहित्य: 
१ वाटी मटकी
१ बटाटा
तळण्यासाठी तेल
१ कांदा
१ टोमॅटो
गरम मसाला
फरसाण
पोहे कुरमुर्याचा चिवडा
कोथिंबीर
लिंबू
ब्रेडचे स्लाईस
कट बनवण्यासाठी साहित्य :३-४ लसूण पाकळ्या
१ इंच आले
२-३ मिरी
१ लहान काडी दालचिनी
२-३ लवंगा
१ तमालपत्र
१ चमचा जिरेपूड
१ चमचा धनेपूड
अर्धी वाटी खवलेला ओला नारळ
१ मध्यम कांदा
२ मध्यम टोमॅटो
४-५ लहान चमचे लाल तिखट
फोडणीसाठी तेल
आमसुल किंवा चिंच
मीठ

कृती:
१) मटकी १०-१२ तास कोमट पाण्यात भिजत घालावे. त्यात जर कडक मटकी आणि खडे असतील तर ते काढून टाकावे. सुती कपड्यात बांधून मोड काढावेत.
२) मटकीला मोड आले कि कट बनवून घ्यावा. त्याचवेळी मटकी कूकरमध्ये २ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी.
३) कट बनवण्यासाठी लसूण पाकळ्या, आले, मिर्या, दालचिनी, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड,धनेपूड मिक्सरवर जेवढे बारीक होईल तेवढे बारीक करून घ्यावे.
४) कढईत ४-५ चमचे तेल गरम करावे. त्यात मिक्सरमधून काढलेला मसाला घालून खमंग परतावा. मसाल्याचा छान गंध सुटला कि त्यात १ कांद्याच्या आणि २ टोमॅटोच्या मोठ्या फोडी घालून परतत रहावे. सर्वात शेवटी खवलेला नारळ घालून परतावा. मिश्रणाला तेल सुटले आणि कांदा शिजला कि गॅस बंद करून बाजूला काढून थंड करावे. मिश्रण थंड झाले कि त्यात १ भांडे पाणी घालून मिक्सरवर पातळ पेस्ट करून घ्यावी.
५) नंतर मटकीची उसळ बनवून घ्यावी. पातेल्यात २-३ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून शिजवलेली मटकी घालावी. थोडे पाणी घालावे, १-२ चमचा गरम मसाला घालावा. बारीक गॅसवर उसळ उकळत असताना दुसर्या गॅसवर लहान कढईत अगदी थोडे बटाट्याचे तुकडे तळण्यापुरते तेल गरम करावे (साधारण अर्धी वाटी). (बटाटे तळल्यावर ७-८ चमचे तेल उरले कि त्यातच कट बनवता येतो.)
६) १ बटाटा सोलून त्याचे लहान चौकोनी तुकडे करावे, आणि मध्यम आचेवर बटाटे व्यवस्थित तळून घ्यावे, कच्चे राहू देऊ नये. तळलेले बटाट्याचे तुकडे उसळीत टाकावेत. चवीपुरते मिठ घालावे.
७) लहान कढई खालचा गॅस बारीक करून उरलेल्या तेलात हळद, हिंग, ४-५ चमचे लाल तिखट घालून तयार केलेली मसाल्याची पातळ पेस्ट घालावी. मीठ घालावे. आंबटपणासाठी २-३ आमसुल किंवा थोडा चिंचेचा कोळ घालावा. आवश्यकतेनुसार पाणी घालून १ उकळी काढावी.
८) उसळ आणि कट तयार झाला कि कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
९) नंतर डिशमध्ये १ डाव उसळ घालावी. त्यावर १ पळी कट घालावा. त्यावर चिवडा, फरसाण, कांदा, टोमॅटो घालावे. लिंबू पिळून तयार मिसळ स्लाईस ब्रेडबरोबर खावी.

टीप:
१) ओला नारळ उपलब्ध नसेल किसलेला सुका नारळसुद्धा वापरू शकतो.
२) ज्यांना तळलेले बटाटे नको असतील त्यांनी शिजवलेले बटाटे घातले तरी चालते. तळलेले बटाटे उसळीत फुटत नाहीत, शिजलेले बटाटे मिसळीत फुटून मिसळ घट्ट होऊ शकते.

मसाले भात



साहित्य:
पाउण कप बासमती/ साधा तांदूळ
वाटण : २ टिस्पून धणे, २ टिस्पून जिरे, १/२ कप कोथिंबीर, ३-४ मिरी, ४-५ लाल सुक्या मिरच्या हे सर्व मिक्सरवर वाटून घ्यावे.
६-७ काजू बी
दिड टिस्पून गोडा मसाला (काळा मसाला)
१ टिस्पून साखर
१ टिस्पून गूळ
चवीपुरते मीठ
२ टिस्पून तेल
१/४ टिस्पून मोहोरी
१/४ टिस्पून हळद
तांदूळाच्या अडीचपट पाणी

कृती:
१) तांदूळ धुवून १० मिनीटे निथळत ठेवणे.
२) नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करून मोहोरी, हळद, काजू घालून तांदूळ परतून घ्यावे. तांदूळ परतताना दुसर्या गॅसवर २ कप पाणी गरम करत ठेवावे.
३) तांदूळ चांगले परतले गेल्यावर त्यात गरम केलेले पाणी घालावे. बारीक गॅसवर उकळी काढावी.
४) उकळी आल्यावर तयार केलेले वाटण, गोडा मसाला, चवीपुरते मीठ, साखर, गूळ घालावा. भांड्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर वाफ काढावी.
५) खाताना भातावर साजूक तूप आणि खवलेला ओला नारळ घ्यावा.

सोलकढी

साहित्य:
७ ते ८ आमसुलं
१ कप नारळाचे दूध
१ ते २ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
२ लसूण पाकळ्या
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१/२ टिस्पून जिरेपूड
चवीपुरते मिठ
१/२ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे

कृती:

१) आमसुलं १/२ कप गरम पाण्यात भिजत टाकावीत. अर्ध्या-पाऊण तासाने त्याच पाण्यात आमसुलं कुस्करून घ्यावीत आणि पाणी गाळून घ्यावे.
२) कोथिंबीर आणि मिरची एका वाडग्यात घ्यावे. त्यात किंचीत मिठ घालून हाताने किंवा चमच्याने कुस्करावे.
३) लसूण बारीक चिरून घ्यावी.
४) जिरे किंचीत कुटून घ्यावे.
फोडणी न करता सोलकढी ::::
नारळाच्या दुधात आमसुलाचे पाणी, कुस्करलेली कोथिंबीर मिरची, चिरलेली लसूण आणि कुटलेले जिरे मिक्स करावे. चवीपुरते मिठ घालावे.
फोडणी केलेली सोलकढी::::
नारळाच्या दुधात आमसुलाचे पाणी, कुस्करलेली कोथिंबीर मिरची आणि चिरलेली लसूण घालून मिक्स करावे. चवीपुरते मिठ घालावे. कढल्यात तूप गरम करून त्यात कुटलेले जिरे घालून हि फोडणी नारळ दुधाच्या मिश्रणात घालावी आणि निट मिक्स करावे.
थंडच सर्व्ह करावे किंवा अगदी मंद आचेवर कोमटसर करावे जास्त गरम करू नये. सर्व्ह करताना वरून जिरेपूड भुरभूरावी. जिरेपूड आधीच मिक्स करू नये नाहीतर सोलकढीचा रंग बदलतो.
सोलकढी नुसतीच किंवा भाताबरोबर खायलाही छान लागते.

टीप:
१) १/४ कप घट्टसर आंबट ताक घातले तर खुप छान चव येते.
२) कोकमाचे आगळ म्हणजेच साखरविरहित कोकमाचा घट्ट कोळ (Kokum Concentrate) बाजारात विकत मिळतो. ते वापरूनही सोलकढी बनवता येते.




कांदे पोहे




साहित्य:
४ मूठ जाड पोहे
१ मध्यम कांदा
फोडणीसाठी : मोहोरी, जिरे, हिंग, हळद
५-६ कढीपत्ता पाने
३-४ हिरव्या मिरच्या
३-४ चमचे तेल
चवीपुरते मीठ
१ लहान चमचा साखर
लिंबू
वरून पेरण्यासाठी चिरलेली कोथिंबीर, खवलेला नारळ

कृती:
१) जाड पोहे चाळणीत घालून भिजवावेत. त्यातील पाणी निथळून गेले कि त्याला थोडे मिठ आणि साखर लावून घ्यायची. कांदा बारीक चिरून घ्यावा.
२) कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालावी. कढीपत्ता, मिरचीचे तुकडे घालावेत. थोडे परतून कांदा घालावा. कांदा गोल्डन ब्राऊन होईस्तोवर परतून घ्यावा.
३) कांदा शिजला कि त्यात भिजवलेले पोहे घालावेत. आणि कालथ्याने निट मिक्स करावे. तेल आणि परतलेला कांदा सर्व पोह्यांना लागेल याची काळजी घ्यावी. मध्यम आचेवर वाफ काढावी. गरज वाटल्यास थोड्या पाण्याचा हबका मारावा तसेच आवश्यक वाटल्यास मिठ घालावे. काही मिनीटे वाफ काढावी.
सर्व्ह करताना पोह्यांवर लिंबू पिळावे आणि वरून चिरलेली कोथिंबीर व खवलेला नारळ घालावा.

टीप:
१) कांदेपोह्यात शेंगदाणेही छान लागतात. तेव्हा फोडणी करताना कांदा शिजत आला कि थोडे शेंगदाणे परतावे व नंतर पोहे फोडणीत घालावे.

काळ्या वाटाण्याची आमटी



साहित्य:
एक कप काळे वाटाणे
कांदा-नारळ पेस्टसाठी: १/४ कप खवलेला ओला नारळ, १/२ कप कांदा, उभा चिरून, १ टेस्पून तेल
फोडणीसाठी
२ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट, ४ कढीपत्ता पाने
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
३ आमसुलं
१ टिस्पून गूळ
१ टेस्पून काळा मसाला
चवीपुरते मिठ

कृती:
१) काळे वाटाणे ८ ते १० तास भिजवावेत. नंतर पाणी काढून टाकावे आणि मोड येण्यासाठी सुती कापडात गच्चं बांधून ठेवावेत (कमीतकमी १० ते १२ तास).
२) पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करावे. कांदा नीट परतून घ्यावा. कांदा व्यवस्थित शिजला पाहिजे, कच्चा राहू देऊ नये. नंतर नारळ घालून परतून घ्यावे. (टीप) हे मिश्रण थोडे गार झाले कि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी.
३) लहान कूकरमध्ये २ टेस्पून तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात भिजवून मोड आलेले वाटाणे घालून एक मिनीटभर परतावे. नंतर त्यात धणेजिरेपूड घालून परतावे. गरजेपुरते पाणी घालावे (साधारण १ ते दिड कप). चवीपुरते मिठ, काळा मसाला आणि आमसुलं घालावीत. मिक्स करून कूकर बंद करावा आणि ५ ते ७ शिट्टया किंवा वाटाणे शिजेपर्यंत शिट्ट्या कराव्यात.
४) कूकर थंड झाला कि उघडावा त्यात कांदा-नारळ पेस्ट घालून उकळी काढावी. आता गुळ घालावा. गरजेनुसार पाणी वाढवावे. चव पाहून तिखट आणि मिठ अड्जस्ट करावे.
हि वाटाण्याची आमटी गरमागरम भाताबरोबर सर्व्ह करावी.

टीप:
१) जर सुके खोबरे वापरायचा असेल तर कांदा परतायच्या आधी सुका नारळ परतावा नंतर कांदा घालावा.
२) काही जणांना कडधान्याची आमटी फोडणीला टाकून प्रेशर कूक करायला आवडत नाही. अशावेळी, आधी प्रेशरकूकरमध्ये फक्त वाटाणे मिठ घालून शिजवून घ्यावेत. आणि नेहमीच्या फोडणीसारखे, कढईत फोडणीस टाकावेत.
३) ताजा खोवलेला नारळ वापरत असाल तर आवडीनुसार जास्त घातला तरी चालेल.
४) सुके खोबरे तेलात चांगले भाजून घेतल्याने त्याचा खमंगपणा या आमटीला छान लागतो. मी ओला नारळ व सुके खोबरे वापरून दोन्ही पद्धतीने आमटी बनवली. ओल्या नारळापेक्षा सुके खोबरे या आमटीत जास्त चांगले लागते, फक्त खोबरे तेलात छान खमंग भाजले गेले पाहिले.